
मुंबई प्रतिनिधी
राज्य शासनाच्या विविध सेवा सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वच संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत.आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व्हॉट्सअपवर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटासोबत करार केला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आरोग्य विषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक तरतूद वाढवण्यासाठी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून निधी घ्यावा. त्यासाठी एक संस्था स्थापन करावी. ही संस्था सीएसआर निधी मिळवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांच्या सेवेसाठी उपयोगात आणेल. संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करेल. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रुग्ण सेवेत येत असलेल्या अडचणींवर मात करत रुग्ण सेवेसाठी निधीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी रुग्णालयांची संलग्नता वाढवून जास्तीत जास्त रुग्णालये पॅनेल करावी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा जन आरोग्य योजना, पंतप्रधान आयुष्मान भारत योजना यापैकी रुग्णाला कुठल्या योजनेचा लाभ मिळेल, यापूर्वी घेतलेला लाभ, कुठल्या आजारावर किती लाभ मिळाला, याबाबत सर्व माहीत पोर्टलवर असावी. खऱ्या गरजूला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी पारदर्शकता आणावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल असे एका अधिकाऱ्याने सांगितलं.