
मुंबई प्रतिनिधी
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्षांचा जुना, ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल अखेर पाडण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाच्या पाडकामाची तारीख सतत पुढे ढकलली जात होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्थानिकांचा विरोध यामुळे हे पाडकाम थांबले होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी २५ एप्रिलच्या रात्री ९ वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
एमएमआरडीएने या पुलाऐवजी नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान, मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः दादर, परळ, करी रोड आणि लालबाग परिसरात याचा अधिक परिणाम जाणवणार आहे. सध्या सायन पूल आधीच बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक मार्गांमध्ये बदल – पर्यायी उपाययोजना जाहीर
1. दादर (पूर्व-पश्चिम) – टिळक ब्रिजचा वापर करण्याचे आवाहन
2. लोअर परळ आणि प्रभादेवी (पूर्व-पश्चिम) – नव्याने बांधण्यात आलेल्या करी रोड ब्रिजचा वापर
3. भायखळा ते कोस्टल रोड/सीलिंक – चिंचपोकळी ब्रिज किंवा एस ब्रिजचा वापर
मुंबई पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा उपयोग करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.