
मुंबई प्रतिनिधी
मुंबई, २३ एप्रिल – मुंबई पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठी कारवाई करत परिमंडळ-७ अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना शहराबाहेर हददपार केलं आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ आणि ५६ अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घाटकोपर पोलिस ठाणे हद्दीतील किरण सुधाकर तोंडसे (३१), कांजुरमार्ग हद्दीतील जीजाबाई अशोक जाधव (६०), आशा काशीनाथ माने ऊर्फ आशा सुरेश गोस्वामी (६०), तसेच भांडुप हद्दीतील जियाउद्दीन मुनीर अंसारी ऊर्फ लालू (२६) आणि फिरोज मुनीर अंसारी ऊर्फ ईददू (२१) या पाच गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली.
हे गुन्हेगार अवैध धंदे व बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हे वारंवार करत होते व त्यामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर कडक पावलं उचलण्याची गरज होती, असे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलिस सह आयुक्त (कायदा सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.