नवी दिल्ली वृत्तसंस्था
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास श्रीनगरपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात लष्करी गणवेशात आलेल्या 2-3 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबारराजा केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बळी गेलेले सर्वजण पर्यटनासाठी आलेले निष्पाप नागरिक होते. प्रत्यक्षदर्शी काही लोकांनी सांगितले की, हल्लेखोरांनी धर्म विचारून निवडकपणे गोळीबार केला.
या अमानुष हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही तातडीने श्रीनगरमध्ये मुक्काम ठोकला असून, घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. ते सौदी अरेबियात दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते, परंतु त्यांनी सोमवारी रात्रीच देशात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सौदी सरकारने आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनालासुद्धा उपस्थित राहणं टाळलं.
पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी मायदेशी परतल्यावर तातडीने कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेणार आहेत. यामध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ सुरक्षा सल्लागार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशातील सुरक्षेची सध्याची स्थिती आणि संभाव्य कारवाई यावर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे.
या घटनेवर अमेरिकाने देखील प्रतिक्रिया देत तात्काळ भारताला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, ‘काश्मीरमधील घटना अत्यंत धक्कादायक आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिकेचा भारताला पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही मृतांच्या आत्म्यास शांती आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो.’
दहशतवाद्यांच्या या कपटी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून, केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.


