
कल्याण प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत ६५ इमारतीचे प्रकरण उघडकिस आलं असताना पालिका आयुक्त पासून ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरण्यात आलं होतं. त्यामुळे अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त होत होती. कल्याण डोंबिवली महापालिकेला तुकाराम मुंढे सारखे आयएएस अधिकारी द्यावे तशी काही संघटनांची कल्याण डोंबिवलीकरांची पत्र ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती.
कल्याण-डोंबिवली महापालिकेला आठवड्या भराच्या प्रतीक्षेनंतर नवे आयुक्त मिळाले आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, राज्य शासनाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.
अभिनव गोयल हे 2015 बॅचचे आयएएस अधिकारी असून, मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आहेत. त्यांच्या घरातील शिक्षणाचा वारसा देखील उल्लेखनीय आहे. आई-वडील डॉक्टर असून, आजोबा भौतिकशास्त्राचे व आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका राहिल्या आहेत.
गोयल यांनी तिसऱ्या प्रयत्नात आयएएस परीक्षा उत्तीर्ण करत 36 वा क्रमांक पटकावला होता. त्यांनी कानपूर येथील आयआयटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे.
अभिनव गोयल यांचा प्रशासनातील अनुभव देखील समृद्ध आहे. 2018 साली नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी आणि अलीकडेच हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. हिंगोलीत त्यांनी लोकाभिमुख निर्णय आणि प्रभावी प्रशासकीय कामकाजाच्या जोरावर चांगली छाप सोडली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणे मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या शहरात प्रशासनाचे आव्हान मोठे असते. त्यामुळे गोयल यांच्या अनुभवाचा फायदा या शहराला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, त्यांनी महापालिकेच्या कामकाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.