
कल्याण प्रतिनिधी
दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाने त्याच्या साथीदारांसोबत एका ६ वर्षीय मुलाचे अपहरण केले. या प्रकरणी व्यावसायिक वडिलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
ही धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात घडली आहे.
डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरातील व्यावसायिक महेश भोईर यांचा मुलगा कैवल्य भोईर हा शाळेसाठी घरातून सकाळी निघाला होता. यावेळी आरोपींनी कैवल्याचे अपहरण केले. काही वेळानंतर महेश भोईर यांना व्हॉट्सअॅप कॉल आला. ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मुलगा हवा असल्यास दोन कोटी रुपये द्या’, अशी धमकी दिली.
आरोपींनी धमकी दिल्यानंतर महेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांना मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच, डीसीपी अतुल झेंडे, डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी पोलिस निरिक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड यांच्या नेतृत्वात चार तपास पथके तयार केली.
मुलाचा शोध सुरु झाला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलगा कैवल्य याला शहापूरातून शोधून काढले. पोलिसांना रिक्षा चालक विरेन पाटीलवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या अपहरण प्रकरणात विरेन पाटील, संजय मढवी आणि अन्य तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. तीन तासांच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच मुलाची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.
या प्रकरणानंतर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मानपाडा पोलिसांचे आभार मानले.