
मुंबई प्रतिनिधी
किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच चिघळला आहे. या मुद्द्यावरुन राज्यात दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीराजेंनंतर आता संभाजी ब्रिगेडने आता या वादात उडी घेतल्याने आणखी वाघ वाढण्याची शक्यता आहे.
एक मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असं अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिले आहे. राज्य सरकारने हे अल्टिमेटम पाळलं नाही तर एक मेनंतर संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा रायगडावरील वाघ्या पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिला आहे.
संभाजी भिडेंना आव्हान?
छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. संभाजीराजेंच्या भूमिकेला राज्य सरकार काय प्रतिसाद देतेय याची आम्ही वाट पाहतोय. ‘मराठा जोडो’ यात्रा संपल्यानंतर एक मे रोजी आम्ही स्वतः पुतळा काढणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. “संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत पण त्यांचा पुरावाही आम्हाला मान्य नसून त्यांनी आमच्या सोबत चर्चेला यावं,” असं आव्हान ही संभाजी ब्रिगेडने संभाजी भिडेंना दिलं आहे. मराठा सेवा संघाची ‘मराठा जोडो’ यात्रा धाराशिव जिल्ह्यात आली असून यावेळी सौरभ खेडेकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
संभाजी भिडेंनी काय म्हटलं आहे?
रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारक हटवण्याला संभाजी भिडेंनी विरोध केला आहे. “संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे,” असं संभाजी भिडे म्हणालेत. “वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे,” असा दवाही संभाजी भिडेंनी केला आहे. “वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे. याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. “स्वार्थासाठी कशीही मत बदलणाऱ्या माणसांना माझे मत पटणार नाही पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेले नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
संभाजीराजे छत्रपतींची भूमिका काय?
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. 31 मेपर्यंतची मुदत दिली आहे. वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं, ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजे यांनी म्हंटलं आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक असल्याचेही संभाजीराजे छत्रपतींनी या पत्रात नमूद केले आहे.