
मुंबई प्रतिनिधी
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीवासीयांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाने विकसित केलेली स्वयंचलित प्रक्रिया आता सर्वच सक्षम यंत्रणांना वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय पात्रता निश्चित होणार आहे. याबाबत राज्य शासनाने १८ मार्च रोजी आदेश जारी केला.
होणार काय?
या निर्णयामुळे आता झोपडीवासीयांची पात्रता तात्काळ निश्चित होणार आहे, असे झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. या प्रक्रियेचा वापर न करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या प्रक्रियेचा वापर न करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडून खर्चही वसूल केला जाणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
झोपडीवासीयांची पात्रता निश्चित करणासाठी मतदार यादी, विजेचे बिल, आधार कार्ड आदींची आवश्यकता होती. मात्र ही कागदपत्रे काही वेळा बनावट सादर करून त्याद्वारे पात्रता निश्चित केली जात होती. सक्षम अधिकाऱ्याचा पात्रता निश्चित करण्याचा दरही ठरलेला होता. हा दर दिला तर पात्रता यादीत वाढही होत होती.
पात्रता लवकर व पारदर्शक पद्धतीने निश्चित व्हायला हवी, यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन एका क्लिकवर झोपडीवासीयाची पात्रता निश्चित होत आहे. यासाठी आवश्यक ती माहिती आता मतदार यादी (निवडणूक आयोग), आधार (युनिक आयडेंटिफिकेश ॲथॉरिटी ॲाफ इंडिया), वीज बिल (अदानी इलेक्टिलिटी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ – एमएसईबी, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी -बेस्ट) यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हा डेटा उपलब्ध असल्यामुळे झोपडीवासीयाची माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय तपासणे सोपे झाले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आता शासनाने याबाबत आदेश जारी करून ते बंधनकारक केले आहे.