
विरार प्रतिनिधी
मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विरार फाट्याजवळ एका ओसाड ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं आढळून आल्याची घटना घडली आहे. एका लहान मुलाने सुटकेस उघडून पाहिली असता हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ ही घटना उघडकीस आली आहे. दर्ग्याजवळील ओसाड जागेमध्ये एक सुटकेस सापडली होती. स्थानिक मुलं या परिसरात खेळत होती तेव्हा त्यांचं बॅगेकडे लक्ष्य गेलं. स्थानिक मुलांनी बॅग उघडून पाहिली असता एकच धक्का बसला. या सुटकेसमध्ये एका महिलेचं मुंडकं होतं. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या सुटकेसमध्ये महिलेचं फक्त शीर आढळून आलं आहे. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ती सुटकेसमध्ये टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या कलिना येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली असून, अधिक तपास सुरू आहे.
मांडवी पोलीस या हत्येचा तपास करत असून, हा गुन्हा कोणी आणि कोणत्या कारणाने केला याचा शोध घेत आहेत.