
जालना प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात वाळू माफियांचा अक्षरशा हैदोस सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत.
बदनापूर तालुक्यातील घोटण गावात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार आणि त्यांच्या तीन ते चार सहकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात जगदीश शेळके आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही दोन ते तीन दिवसांपूर्वी परतूर येथील तहसीलदारांवर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला होता. या सततच्या घटनांमुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आठवड्यातली दुसरी घटना
जालना जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांवर वाळू माफियांचे हल्ले वाढत आहेत. चार दिवसांपूर्वी परतूर येथील तहसीलदार प्रतिभा गोरेंवर अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केला होता. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बदनापूर तालुक्यातील घोटण गावात नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे. या घटनांमुळे जालना जिल्ह्यात वाळू माफियांचा धुडगूस सुरूच असल्याचे दिसते.
अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाने विशेष पथकाची नियुक्ती केली असली, तरी कारवाईदरम्यान अनेकदा पोलीस कर्मचारी सोबत न नेण्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे महसूल पथकावर हल्ल्यांच्या घटना घडत असून, त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहेच तसेच, महसूल पथकातील कर्मचारी कारवाईदरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला सोबत का नेत नाही असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हल्लेखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची महसूल संघटनेची मागणी
जालना जिल्ह्यात महसूल पथकासह तहसीलदारांवर वाळू माफियांकडून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.
महसूल संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय चव्हाण यांनी इशारा दिला आहे की, जर महसूल पथकांवरील हल्ले तातडीने थांबवले नाहीत, तर राज्यभरातील महसूल कर्मचारी काम बंद आंदोलन करतील. महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.