
पुणे प्रतिनिधी
आज प्रत्येक क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसत आहे.तर आज जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्या महिलांचा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जात आहे.तर आज आपण अशाच एका यशस्वी तरुणीशी संवाद साधणार आहोत,ती म्हणजे पुणे पोलीस विभागातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील दामिनी पथकात काम करणारी सोनाली हिंगे या तरुणीचा पोलीस कर्मचारी होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.सोनाली हिंगे या कबड्डीपटू ते महिला पोलीस कर्मचारी आणि दामिनी पथकातील आजवरचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
यावेळी सोनाली हिंगे म्हणाल्या, मी सर्व सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झाली.मला लहानपणापासून कबड्डीची आवड होती.तीच आवड जोपासत, गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत होणार्या कबड्डीच्या स्पर्धामध्ये सहभागी होत राहिले,त्या प्रत्येक स्पर्धेत मी पदक जिंकत राहिले.त्या प्रत्येक स्पर्धेच्या वेळी मला माझ्या कुटुंबियांनी मोलाची साथ दिल्याने क्रिडा क्षेत्रात नाव करू शकले.पण दुसर्या बाजूला खेळासोबत अभ्यास केला पाहिजे,चांगल मार्क मिळव,असे कुटुंबातील सांगत आले आणि मी बी कॉम केले आहे आणि आता एमफील च शिक्षण घेत आहे.