
पुणे प्रतिनिधी
सांगवी पोलीस ठाण्यासमोर ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करणे पोलीस अंमलदाराबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना महागात पडले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस अंमलदारांना निलंबित करण्याचे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस नियंत्रण कक्षाला संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. बर्थ डे बॉय पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार विवेक गायकवाड सुहास डंगारे विजय मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांचा बर्थ डे बुधवारी रात्री १२ वाजता पोलीस ठाण्याच्या बाहेर जोरदार फटाके उडवून साजरा करण्यात आला. त्यात पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार तसेच काही गुन्हेगार देखील सहभागी झाले होते. बरोबर बाराच्या ठोक्याला दुमलजी केक कापण्यात आला. हातात फायर गन, स्काय शॉट, फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. याचे ड्रोन द्वारे चित्रिकरण करण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीसच सर्व नियम झुगारुन रात्री बारा वाजता पोलीस ठाण्याबाहेरच सेलिब्रेशन करत असल्याने त्यावर टिका होऊ लागली. हे व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांपर्यंत पोहचले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची पोलीस नियंत्रण कक्षाला बदली केली. तसेच बर्थ डे बॉय प्रवीण पाटील याच्यासह त्यात सहभागी झालेले पोलीस अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.