
सातारा प्रतिनिधी
स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाने राज्यातील सर्व स्थानकांचे ऑडिट सुरू केले आहे त्याचाच भाग म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा मध्यवर्ती बस स्थानकासह वर्दळीच्या बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये स्क्रॅप बसची हलवाहलवी, योग्य ठिकाणी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ या प्रकारे सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात येत आहे.महामंडळाचे सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी याबाबतची माहिती दिली.
स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील राज्यातील सर्व बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा शहरातील मध्यवर्ती स्थानकासह इतर तालुका आगारांचेच्या ठिकाणांच्या स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याच्या सूचना निर्गमित झाल्या आहेत. सातारा शहर मध्यवर्ती बस स्थानक, मेढा, महाबळेश्वर, वाई, फलटण, वडूज, दहिवडी, कराड, पाटण, लोणंद, शिरवळ, खंडाळा, कोरेगाव या बस स्थानकांमध्ये प्रवाशांची सतत वर्दळ असते. अशा बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये स्थानकाच्या आवारातील बंद शिवशाही बस व स्क्रॅप बसेसची नोंद घेण्यात आली आहे. याची आकडेवारी मात्र प्रशासनाने दिली नाही. बस स्थानकामध्ये पोलीस चौकी आणि तेथील बंदोबस्तावरील कर्मचारी यासह सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे या उपायोजनांवर भर दिला जात आहे. तसेच प्रामुख्याने प्रवासी सुरक्षितता, स्थानकात पुरेशी प्रकाश व्यवस्था त्याबाबतचे उपाय. सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची ठिकाणे, उभ्या केल्या जाणाऱ्या बसेस, स्क्रॅप बसेस, आवश्यक सीसीटीव्ही अशा गोष्टी तपासल्या जात आहेत.
प्राथमिक टप्प्यात पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षारक्षकांची वाढ आणि त्यांची योग्य ठिकाणी नेमणूक या गोष्टी तपासून त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. बस स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्यांवर विशेष लक्ष राहील. त्याकरता उच्च दर्जाचे सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष याबाबतही पलंगे यांनी आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक चौकशी कक्षामध्ये महिला अधिकाऱ्यांची नेमणूक यावर काम केले जाणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे.
शिवशाही बसची सेवा समाप्त करा
एसटी बस स्थानकामध्ये सातारा आगारामध्ये 29 शिवशाही बसेस आहे. त्यातील अपवाद वगळता शिवशाही या सेवा बजावत आहेत. मात्र, वातानुकूलन यंत्रणा बंद असणे, शिवाय हवेचा दाब कमी झाल्यानंतर आपोआप दरवाजा उघडणे अशा काही तांत्रिक त्रुटी या बसमध्ये आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वाहकांना एसटीचे दरवाजे व्यवस्थित लॉक करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. बस पार्किंग करताना काय काळजी घ्यावी याच्याही सूचना आगार प्रमुखांनी दिल्या आहेत.