
मुंबई प्रतिनिधी
अलिबागजवळ भर समुद्रातच एका मच्छिमार बोटीला आज (दि.२८) सकाळी अचानक आग लागली. काही क्षणातच या आगीने भीषण रुप धारण केले आणि ८० टक्के बोट जळून खाक झाली. सुदैवाने या बोटीवर असलेल्या १४ ते १८ जणांना वेळीच वाचवण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ६.४५ च्या सुमारास ‘एकविरा माऊली” (IND-MH-03-MM-4922) ही बोट “धनलक्ष्मी” या दुसऱ्या मासेमारी बोटीला ओढत असताना अचानक बोटीच्या इंजिनमध्ये आग लागली. बोटीवरुन संकटाचा इशारा मिळाला आणि लगेच भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर कोस्ट गार्डची ICGS सावित्रीबाई फुले ही बोट आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. “एकविरा माऊली” बोटीवरील सर्व १४ ते १८कर्मचाऱ्यांना “धनलक्ष्मी” या दुसऱ्या मासेमारी बोटीत सुरक्षितपणे हलवून अलिबागला नेण्यात आले. आग लागलेली बोट आक्षी साखर येथील राकेश मारुती गण यांच्या मालकीची आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.