
मुंबई प्रतिनिधी
मराठी माणसावर परप्रांतियांकडून होणारे हल्ले थांबत नसल्याचे दिसत आहे. अशातच मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील मुंबई विद्यापीठाच्या परिसरात परप्रांतीयाकडून मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी मराठी तरुणाने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी क्रॉस गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणी आता मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. उद्या बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुज पूर्वेकडील मुंबई विद्यापीठाच्या बाहेरील सांताक्रुज चेंबूर जवळ रस्त्याच्या पदपथावर अनेक नर्सरी अवैधपणे उभ्या राहिल्या असून इथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांच्या नर्सरी आहेत. याच भागात मराठी तरुणांकडून नर्सरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यावेळी परप्रांतीयाकडून मराठी तरुणाला शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे मराठी तरुणाने परप्रांतीय विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मात्र बीकेसी पोलिसांनी दोघांविरोधात क्रॉस गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना समजावून पुन्हा भांडण करू नका अशी समज देऊन सोडून देण्यात आले. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागात परप्रांतियाकडून मराठी तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली यामध्ये मराठी तरुणाचे डोके फुटले आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठी तरुणाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट परप्रांतीकडून आता त्या मराठी तरुणाला घाबरवण्यासाठी महिलांचा वापर केला जात आहे. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी सुद्धा आता परप्रांतीय तरुणांनी दिली. सांताक्रुज येथील या घटनेची दखल मराठी एकीकरण समितीकडून घेण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आणि पोलिसांना जाब विचारण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे सदस्य बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार आहे. अशी माहिती सांताक्रुझ मराठी एकीकरण समितीचे नितेश शिंदे यांनी दिली आहे.