
मुंबई प्रतिनिधी
भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्याकडे या संदर्भात पार पडलेल्या सुनावणीनंतर जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.
आता माजी आमदार गायकवाड यांच्या वकिलांच्या मार्फत जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो.
कल्याणचे भाजप माजी आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील एका जागेच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. ही घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली होती. या घटनेनंतर माजी आमदार गायकवाड यांना अटक झाली होती. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. सध्या माजी आमदार तळोजा जेलमध्ये आहेत.
माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वकिलामार्फत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. गोळीबाराच्या घटनेचे प्रथमदर्शी पुरावे मिळून आले आहेत. माजी आमदार गायकवाड हे जामीनावर सुटून आल्यावर या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराना पुरावा देण्यापासून परावृत्त करु शकतात. हे मुद्दे प्रतिपक्षाच्या वकिलांनी उपस्थित केले. या मुद्याच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश वाघमारे यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे एकून घेत माजी आमदार गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.