
अमरावती प्रतिनिधी
कठोर परिश्रम जिद्द चिकाटीच्या जोरावर हिवरखेड, अमरावती जिल्ह्यातील ता.मोर्शी येथील दोन सख्या बहिणींनी पोलीस दलात स्थान मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. आरती रामकृष्ण बंदे यांनी 2023 मध्ये तर पूजा रामकृष्ण बंदे यांनी 2025 मध्ये पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण करत यश मिळवले आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश गावासाठी अभिमानास्पद आहे. या बहिणींचे वडील लोहारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी आहे. त्यांचा एकुलता एक भाऊ सध्या शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती तशी साधी असली तरी या दोघींनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले. कोणतीही विशेष सुविधा नसतानाही त्यांनी पोलीस भरती परीक्षेसाठी अपार मेहनत घेतली.
पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी शारीरिक आणि लेखी चाचण्या पार कराव्या लागतात. त्यामुळे या दोन्ही बहिणींनी कठोर मेहनत घेतली. पहाटे लवकर उठून व्यायाम, धावणे आणि शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला. त्याचबरोबर दिवसभर अभ्यास करून लेखी परीक्षेचीही तयारी केली. सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी हा टप्पा पार केला. दोन्ही बहिणींच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, शिक्षक आणि नातेवाईक त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत. “आमच्या मुलींनी कठीण परिस्थितीतही हार न मानता पोलीस दलात स्थान मिळवले, याचा आम्हाला खूप अभिमान आहे,” असे त्यांच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीला पर्याय नाही. सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते,” असा संदेश या यशस्वी बहिणींनी दिला आहे. त्यांच्या यशाने गावातील तरुणांना आणि विशेषतः मुलींना नवी प्रेरणा दिली आहे. हिवरखेडसारख्या ग्रामीण भागातून दोन सख्या बहिणींनी पोलीस दलात भरती होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या संघर्षाच्या आणि यशाच्या प्रवासामुळे गावातील अनेक विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळाली आहे.