विटा : प्रदीप जोशी
ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या प्रतिसरकारच्या ऐतिहासिक लढ्याची गाथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘पत्री सरकार १९४२’ हा मराठी चित्रपट २० नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी नेते भाई सुभाष बापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हे ब्रिटिश सरकारविरोधातील स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे आणि धगधगते पर्व होते. १९४२ मध्ये स्थापन झालेल्या देशातील सर्वाधिक काळ टिकलेल्या सशस्त्र भूमिगत लढ्याचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तत्कालीन सातारा जिल्ह्यातील जवळपास ८० ते १०० कार्यकर्त्यांनी घरदार सोडून भूमिगत लढा सुरू केला होता.
सावकार आणि खबऱ्यांना पत्र्या ठोकणे, शेतकरी व शेतमजुरांना न्यायदान करणे आणि ब्रिटिशविरोधी संघर्ष सुरू ठेवणे, अशी कामे या कार्यकर्त्यांनी केली. जुलमी ब्रिटिश सत्ता, सावकारशाही आणि जातीय सरंजामशाहीविरोधात त्यांनी संघर्ष पुकारला. अंधश्रद्धामुक्त, जातीपातीविरहित आणि समाजवादी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न या क्रांतिकारकांनी पाहिले होते.
प्रतिसरकारच्या संपूर्ण चळवळीच्या नेतृत्वाची जबाबदारी नाना पाटील यांच्यावर होती. भूमिगत अवस्थेत ते बैठकांना फारसे उपस्थित राहत नसले, तरी पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या कार्यकर्त्यांकडून पत्र अथवा रिव्हॉल्व्हर कोणी दिले, अशी विचारणा झाल्यास त्यांनी नाना पाटलांचे नाव सांगितले. त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या पोलीस खात्याने त्यांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, जनतेच्या पाठिंब्यामुळे स्वातंत्र्य मिळेपर्यंत नाना पाटील पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
बेळगावच्या सीमेपासून सातारा आणि पुण्यापर्यंत एकाच वेळी अनेक ठिकाणांहून ब्रिटिशांकडे नाना पाटील आल्याचे आणि त्यांनी खबरे व सावकारांचा बंदोबस्त केल्याचे संदेश पोहोचत असत. त्यामुळे नाना पाटील एकाच वेळी अनेक ठिकाणी कसे उपस्थित राहतात, असा प्रश्न ब्रिटिशांना पडत असे. (संदर्भ : जयसिंगराव पवार संपादित क्रांतिसिंह ग्रंथ.)
स्वातंत्र्यानंतरही गोवा मुक्ती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, मराठवाडा मुक्ती, दुष्काळविरोधी लढा, एक गाव एक पाणवठा, जातीव्यवस्थेविरोधातील संघर्ष, शेतीमालाला रास्त भाव आणि मराठी भाषेसाठीच्या चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील अग्रभागी राहिले.
या ऐतिहासिक क्रांतीपर्वावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे. गीत, संगीत, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे. भागीरथी मोशन पिक्चर्सची ही निर्मिती आहे.
या चित्रपटाचा प्रीमियर शो गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. २० नोव्हेंबरपासून हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. बुक माय शोवर चित्रपटाची तिकिटे उपलब्ध असतील.
महाराष्ट्राचा हा तेजस्वी इतिहास जाणून घेण्यासाठी नागरिकांनी परिवार, मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह चित्रपट पाहावा, असे आवाहन भाई सुभाष बापू पाटील, प्रा. प्रतिमा परदेशी, संपत मोरे, किशोर ढमाले, इंद्रजीत पाटील, दमयंती पाटील आणि प्राची दुधाने यांनी केले आहे.


