सोलापूर प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एकच खळबळ उडाली. कार्तिकी वारीच्या तयारीचा आढावा घेऊन मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे यांचे हेलिकॉप्टर ऐनवेळी सुरूच झाले नाही. बॅटरीची क्षमता कमी झाल्याने हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू झाले, मात्र दुसरे इंजिन सुरू करण्यात अडचण आली. त्यामुळे शिंदे यांना तब्बल २० ते २५ मिनिटे हेलिपॅडवर थांबावे लागले. अखेर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा निर्णय रद्द करून ते रस्तेमार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
कार्तिकी वारीचा आढावा घेतल्यानंतर प्रकार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (१९ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचे वाळवंट, दर्शन रांगा आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या पत्राशेडची पाहणी केली. तसेच कार्तिकी यात्रेच्या नियोजनाचा प्रशासकीय आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दौरा आटोपल्यानंतर शिंदे मुंबईला जाण्यासाठी हेलिपॅडवर पोहोचले. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर पायलटकडून ते सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हेलिकॉप्टर सुरू होण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली. सुरुवातीला एक इंजिन सुरू झाले; परंतु दुसरे इंजिन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली बॅटरीची क्षमता कमी पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उड्डाणाचा नियोजित कार्यक्रम रखडला.
प्रशासनाची धावपळ; सुरक्षिततेला प्राधान्य
हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याचे लक्षात येताच हेलिपॅडवर उपस्थित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. बॅटरी बदलण्यासाठी दुसरी बॅटरी मागविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, तांत्रिक अडचण तातडीने दूर होण्याची शक्यता नसल्याने शिंदे यांना हेलिपॅडवरच काही काळ थांबावे लागले.
दरम्यान, कोणताही धोका पत्करण्यापेक्षा पर्यायी प्रवासाचा मार्ग स्वीकारावा, अशी विनंती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी केली. त्यानंतर शिंदे यांनी हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करून मोटारीने पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. पुणे विमानतळावरून पुढील प्रवास विमानाने करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितला नेमका प्रकार
या घटनेबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजीत पाटील यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे साहेबांनी कार्तिकी वारीच्या नियोजनाची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर ते हेलिकॉप्टरमध्ये बसले. आम्ही तेथून बाजूला गेलो होतो. मात्र, हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा तिथे गेलो. त्यावेळी पायलटने एक इंजिन सुरू झाल्याचे सांगितले; परंतु दुसरे इंजिन सुरू करण्यासाठी बॅटरी लो झाल्याने अडचण निर्माण झाली होती.”
या तांत्रिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी पुण्यातून विमानाने पुढील प्रवास करण्याची विनंती केली. त्यानुसार एकनाथ शिंदे पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्याचे अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर हवाई प्रवासाची चर्चा
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला २८ जानेवारी रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांच्या हवाई प्रवासाबाबत सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपुरात तांत्रिक बिघाड झाल्याने या घटनेची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड उड्डाणापूर्वीच लक्षात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडाचे नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.


