मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेचा प्रवास आता किती असुरक्षित होत चालला आहे, याचा प्रत्यय देणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन प्रवाशांमधील किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात एका तरुणाने अंधेरी स्थानकातून उतरल्यानंतर धावत्या लोकलमधील दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने चाकू भिरकावला. मात्र, त्याचा नेम चुकला आणि तो चाकू थेट तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला. या हल्ल्यात ५३ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (१५ नोव्हेंबर) घडलेल्या या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेतील जखमी प्रवाशाचे नाव सुरेश द्वारका शर्मा (वय ५३) असे आहे. ते मूळचे झारखंडमधील हजारीबाग येथील असून, सध्या धारावी परिसरात राहतात. सुतारकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त ते बोरीवली येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलने ते प्रवास करत होते. लोकलच्या पहिल्या जनरल डब्यात दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्या मागील बाजूला बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ सुरू होती. मात्र, अंधेरी स्थानक जवळ येताच हा वाद अधिकच चिघळला.
अंधेरीत उतरला अन् धावत्या लोकलवर चाकू भिरकावला!
दुपारी सुमारे १२.१२ वाजण्याच्या सुमारास लोकल अंधेरी स्थानकात थांबली. त्यावेळी वाद घालणाऱ्या दोघांपैकी एक तरुण फलाटावर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला. लोकल फलाट सोडून पुढे निघत असताना फलाटावर उतरलेल्या तरुणाने संतापाच्या भरात डब्यातील दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने धारदार चाकू भिरकावला. मात्र, चाकूचा नेम चुकला आणि तो दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला जाऊन घुसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यात एकच आरडाओरडा सुरू झाला. छातीत चाकू घुसल्याने शर्मा यांना मोठी जखम झाली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. काही क्षणांपूर्वी निवांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
साखळी ओढली, वांद्रे स्थानकात धावपळ!
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच सहप्रवाशांनी प्रसंगावधान राखत लोकलची आपत्कालीन साखळी ओढली. त्यामुळे लोकल वांद्रे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर थांबवण्यात आली. तेथे तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेतील शर्मा यांना स्थानक व्यवस्थापकाच्या कार्यालयात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
२५ वर्षीय तरुणाला अटक; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
दरम्यान, घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चाकू फेकल्याचा आरोप असलेल्या शिवा गायकवाड (वय २५) या तरुणाला ताब्यात घेतले. काही वृत्तांनुसार त्याचे पूर्ण नाव शिवाजी लक्ष्मण गायकवाड असून तो नाशिक जिल्ह्यातील निफाडचा रहिवासी आहे. तो विनातिकीट प्रवास करत असल्याची माहितीही समोर आली आहे. हा प्रकार अंधेरी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. जखमी प्रवाशाच्या जबाबावरून हत्येचा प्रयत्न आणि अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मयंक लोहार हत्या प्रकरणानंतर पुन्हा लोकलमध्ये चाकूचा थरार!
मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमधील वादातून हिंसाचार घडण्याची ही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी मयंक लोहार या तरुणाची लोकलमधील वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. कामावरून घरी परतत असताना लोकलच्या दरवाजातून पावसाचे पाणी आत येण्याच्या कारणावरून मयंक आणि दुसऱ्या प्रवाशामध्ये वाद झाला होता. गोरेगाव आणि मालाडदरम्यान लोकलची आपत्कालीन साखळी ओढल्यानंतर आरोपीने मयंकच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपीकडून तब्बल दोन महिन्यांपासून लोकलमधून चाकू नेला जात असल्याची बाबही तपासात समोर आली होती.
विशेष म्हणजे, मुंबईच्या लोकलमधील हिंसक घटनांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. ४ नोव्हेंबर रोजी नायगाव स्थानकाजवळ लोकलमधील वादातून एका २० वर्षीय तरुणीला धावत्या ट्रेनमधून ढकलल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली होती.
मुंबई लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. मात्र, किरकोळ कारणांवरून होणारे वाद, मारहाण, चाकूहल्ले आणि हत्यांसारख्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गर्दीच्या लोकलमध्ये शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण कसे ठेवायचे, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था किती प्रभावी आहे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन नेमके काय करणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासात सुरक्षिततेची हमी मिळणार तरी कधी, हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.


