मुंबई प्रतिनिधी
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रस्ते किंवा रेल्वे प्रवासाला पर्याय म्हणून आता नवी मुंबई ते सिंधुदुर्गदरम्यान थेट विमानसेवा सुरू झाली आहे. अवघ्या १ तास १० मिनिटांत नवी मुंबईहून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पोहोचता येणार आहे. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीकडून आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळादरम्यान ही नॉन स्टॉप विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. दोन्ही दिशांचा प्रवास करण्यासाठी नियोजित वेळ १ तास १० मिनिटे आहे. सध्या या मार्गावर दररोज एक फेरी नियोजित करण्यात आली आहे.
तिकीट किती आणि विमानाचे वेळापत्रक काय?
‘फ्लाय ९१’ कंपनीच्या ७२ आसनी विमानाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, नवी मुंबईहून सिंधुदुर्गसाठी विमान सकाळी ७.५५ वाजता उड्डाण करेल. ते सकाळी ९.०५ वाजता चिपी विमानतळावर पोहोचेल. तर चिपी येथून नवी मुंबईसाठी विमान सकाळी ९.२५ वाजता रवाना होईल आणि सकाळी १०.३० च्या सुमारास नवी मुंबईत दाखल होईल.
या विमान प्रवासासाठी तिकिटांचे दर साधारण ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांदरम्यान ठेवण्यात आले आहेत. मात्र, मागणी आणि उपलब्धतेनुसार तिकीट दरात बदल होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून १६.७४ कोटींचा निधी मंजूर
या विमानसेवेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने १६ कोटी ७४ लाख ६२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘फ्लाय ९१’ कंपनीला प्रत्येक आरसीएस आसनामागे ६ हजार २०० रुपये या दराने १०० टक्के व्यवहार्यता तूट निधी (व्हीजीएफ) दिला जाणार आहे.
३० मार्च २०२६ रोजी चिपी-मुंबई विमानसेवेसाठी कंपनीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, मुंबई विमानतळावर उड्डाणासाठी स्लॉट उपलब्ध न झाल्याने ही सेवा सुरू होऊ शकली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) नवी मुंबई विमानतळाचा पर्याय निवडला.
प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्यापासून एक वर्षासाठी राज्य सरकारचे अनुदान लागू राहणार आहे. मात्र, त्यापूर्वी केंद्र सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क योजनेतून ही सेवा सुरू झाल्यास राज्याचे अनुदान बंद होणार आहे. या थेट विमानसेवेमुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि प्रवाशांच्या दळणवळणाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


