पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, मनमिळाऊ आणि नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध जपणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल देवराम मखरे (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. १० नोव्हेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाने पुणे पोलीस दलात शोककळा पसरली असून, सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. कात्रज येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने राहुल मखरे हे सहकुटुंब वेल्हे येथील आपल्या गावी गेले होते. याचदरम्यान त्यांच्या छातीत जळजळ होऊ लागल्याने त्यांनी जवळच्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
शिपायापासून उपनिरीक्षकापर्यंतचा प्रवास!
राहुल मखरे यांनी पोलीस शिपाई म्हणून पुणे शहर पोलीस दलात आपल्या सेवेला सुरुवात केली होती. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम केले. तसेच वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखेतही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. आपल्या कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली होती. निधनाच्या वेळी ते खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभव, कामातील शिस्त आणि सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. नागरिकांशी संवाद साधताना त्यांचा नेहमीच सौहार्दपूर्ण दृष्टिकोन असायचा. कठोर पोलीस कर्तव्य बजावत असतानाही माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून ते परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने मखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने पुणे पोलीस दलाने एक अनुभवी आणि मनमिळाऊ अधिकारी गमावला आहे.


