सांगली : प्रदीप जोशी
सांगली : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, बाधित गावांमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून टँकर आणि विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ७० टँकरद्वारे जिल्ह्यातील ६६ गावे आणि ४७९ वाड्यांमधील १ लाख ४३ हजार ८८८ नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय १६ हजार २१२ पशुधनासाठीही पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या ११ नोव्हेंबरअखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यात सुरू असलेल्या ७० टँकरपैकी ६२ खासगी, तर ८ शासकीय टँकर आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ३० खासगी विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. बाधित गावांमध्ये टँकरने पाणी पोहोचविण्यासोबतच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या खासगी विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जत तालुक्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसत आहे. तालुक्यातील ५७ गावे आणि ४१४ वाड्यांमधील सुमारे १ लाख २४ हजार ८६७ नागरिकांना ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ५३ खासगी आणि ७ शासकीय टँकरचा समावेश आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्यात १८ खासगी विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच पाणीपुरवठ्यासाठी ४ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आली आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील ८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील १ हजार ८३४ नागरिकांसाठी एक शासकीय टँकर सुरू करण्यात आला आहे. नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून दोन खासगी विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
तासगाव तालुक्यातही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, एका गावातील सहा वाड्यांमधील ८५५ नागरिकांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी तालुक्यातील तीन खासगी विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील सात गावे आणि ५१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. या भागातील १६ हजार ३३२ नागरिकांसह १६ हजार २१२ पशुधनासाठी आठ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची नोंद अहवालात आहे. तालुक्यात पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था म्हणून चार विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
खानापूर तालुक्यातील दोन गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून, तेथील पाणीपुरवठ्यासाठी तीन खासगी विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून टँकर आणि विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून उपाययोजना राबविल्या जात आहेत. विशेषतः जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, अन्य तालुक्यांमध्येही उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.


