छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी परिसरातील निवासस्थानावर तिघा तरुणांनी दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सातारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात तरुणांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानाला लक्ष्य केले. संबंधित तरुणांनी घराच्या दिशेने दगडफेक केली, तसेच काचेच्या बाटल्याही फेकून मारल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग केला. या प्रयत्नात झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अखेर पोलिसांनी तिन्ही तरुणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांनी मंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणातून केला, याचा तपास सुरू असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतरही वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी का पोहोचले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलीस आयुक्तांचा फोन बंद असल्याचा आरोप
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. तसेच एकही डीसीपी किंवा एसीपी घटनास्थळी दाखल झाले नसल्याची तक्रार शिरसाट यांनी केली. पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होत असताना पोलिसांनी किमान या घटनेची तरी गंभीर दखल घ्यायला हवी होती, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी संपर्क साधला. महासंचालकांनी फोन उचलून या घटनेची गंभीर दखल घेतली आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे शहरातील पोलीस यंत्रणेच्या तत्परतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सध्या तिन्ही आरोपींच्या चौकशीतून हल्ल्यामागील कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.


