कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच राज्य सरकारने गोकुळच्या संचालक मंडळावर चार शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर सभेत या चार सदस्यांची नावे घेत त्यांच्या नियुक्तीचा दावा केला होता. अखेर त्यांनी सांगितलेली नावेच अधिकृतपणे जाहीर झाल्याने सतेज पाटील यांचा दावा खरा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांमध्ये शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, ॲड. प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील यांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून यासंदर्भातील नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय सहायक निबंधक (दुग्ध) कृष्णात ठाकरे यांची शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या शासकीय अधिकाऱ्याला मतदानाचा अधिकार नसून अन्य चार नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
कोल्हापूरचे तीन, सांगलीचा एक सदस्य
शासननियुक्त सदस्यांच्या निवडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आणि सांगली जिल्ह्यातील एका सदस्याचा समावेश आहे. शिवाजी आडनाईक हे पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथील आहेत. डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे हे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील आहेत. कृष्णात ज्ञानदेव पाटील हे कागल तालुक्यातील केनवडे येथील असून ॲड. प्रशांत पाटोळे हे सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथील आहेत.
विशेष म्हणजे, शासनाकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच सतेज पाटील यांनी या चारही नावांचा उल्लेख केला होता. त्यामुळे शासन नियुक्त सदस्यांच्या निवडीमागील राजकीय गणिताबाबतही चर्चेला उधाण आले आहे.
१३ विरुद्ध १२ चे गणित बदलणार!
गोकुळच्या २५ संचालकांच्या निवडणुकीत राजर्षी शाहू समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत महायुतीच्या १२ जागांवर मात केली होती. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने सतेज पाटील यांच्या गटाचे पारडे जड होते. मात्र, राज्य सरकारने चार सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलले आहे.
महायुतीचे १२ निवडून आलेले संचालक आणि चार शासननियुक्त सदस्य अशी एकत्रित १६ मतांची ताकद महायुतीकडे निर्माण होऊ शकते. त्यामुळे महायुतीला अध्यक्षपद मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. दुसरीकडे, शासन नियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराला विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; चार मते स्वतंत्र पेटीत
शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारावरून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. चार शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आज, १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.
मात्र, या चार सदस्यांची मते स्वतंत्र मतपेटीत ठेवण्याचे, संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आणि निकाल जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या चार मतांचा अंतिम विचार न्यायालयाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राष्ट्रवादीचा अध्यक्ष की काँग्रेसचा? आज फैसला!
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज सकाळी ११ वाजता शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीतसिंह पाटील यांचे नाव चर्चेत असून, त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव पुढे आले आहे.
गोकुळमध्ये निवडून आलेल्या संचालकांचे संख्याबळ, शासननियुक्त सदस्यांची चार मते, न्यायालयाचे निर्देश आणि महायुतीमधील अंतर्गत राजकीय समीकरणे या सगळ्यांचा कस आज लागणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोकुळची सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सतेज पाटील यांच्या १३ संचालकांच्या बहुमताला शासन नियुक्तीच्या माध्यमातून शह देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न यशस्वी होणार का, याचा फैसला आज होणार आहे.


