ठाणे प्रतिनिधी
दिवाळीच्या सणाच्या धामधुमीत महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत झारखंडमधील एका कुख्यात आणि फरार नक्षलवाद्याला डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरातून अटक केली आहे. विशेष म्हणजे, या नक्षलवाद्याला पकडण्यासाठी झारखंड सरकारने तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देणारा हा नक्षलवादी अखेर महाराष्ट्र एटीएसच्या जाळ्यात अडकला आहे. ऐन दिवाळीत वर्दळीच्या शहरी भागात एवढ्या मोठ्या बक्षिसाचा नक्षलवादी आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
संजय सरोज यादव उर्फ संजय गोधरे उर्फ बुधराम (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील छतरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगन गावचा रहिवासी आहे. तो प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या झोनल कमिटीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप असून, त्याचा शोध घेण्यासाठी झारखंड पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली होती.
ठाकुर्लीत गुप्तपणे वास्तव्य; गायींची देखभाल करण्याचे काम!
मिळालेल्या माहितीनुसार, संजय यादव गेल्या सुमारे दहा दिवसांपासून डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील खंबाळपाडा परिसरात वास्तव्याला होता. कामाच्या शोधात तो या भागात आला होता. एका बंगल्याच्या गोठ्यात गायींची देखभाल करण्याचे काम त्याला मिळाले होते. त्याच ठिकाणी राहून तो आपली ओळख लपवत होता.
दरम्यान, झारखंड पोलिसांना संजय यादव ठाकुर्ली परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर झारखंड पोलिसांनी महाराष्ट्र एटीएसशी संपर्क साधला. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. अखेर खंबाळपाडा परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोबाईल फोन आणि काही रोख रक्कमही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
आठ दिवसांची मागणी; न्यायालयाकडून तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड
अटकेनंतर आरोपीला पुढील तपासासाठी झारखंडमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले. झारखंड पोलिसांनी न्यायालयाकडे आठ दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली होती. मात्र, आरोपीच्या बचाव पक्षाचे वकील मनीष उज्जैनकर यांनी युक्तिवाद करताना विमानाने झारखंडला घेऊन जायचे असल्याने दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड पुरेशी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. त्यामुळे आता झारखंड पोलीस त्याला आपल्या ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी झारखंडला रवाना होणार आहेत.
दिवाळीत घातपाताचा कट होता का? तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न!
दरम्यान, या अटकेनंतर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे संजय यादव महाराष्ट्रात नेमका कशासाठी आला होता? झारखंडमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेला आणि तब्बल १० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी अचानक डोंबिवलीसारख्या वर्दळीच्या शहरी भागात येऊन राहतो, यामागे नेमके कारण काय?
तो केवळ कामाच्या शोधात महाराष्ट्रात आला होता की त्यामागे आणखी काही वेगळा उद्देश होता? महाराष्ट्रातील नक्षलवादी नेटवर्कशी त्याचे काही संबंध आहेत का? त्याला ठाकुर्लीत आश्रय देण्यासाठी कोणी मदत केली? त्याचे स्थानिक संपर्क कोण आहेत? दिवाळीच्या काळात एखाद्या घातपाताचा कट आखण्याचा त्याचा उद्देश होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मात्र, त्याचा घातपाताचा कोणताही कट होता, असे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सर्व शक्यतांच्या अनुषंगाने तपास यंत्रणा चौकशी करीत आहेत. त्याच्या मोबाईलमधील संपर्क, मागील काही दिवसांतील हालचाली आणि महाराष्ट्रातील संभाव्य साथीदारांची माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसच्या या कारवाईमुळे झारखंड पोलिसांना मोठे यश मिळाले असून, नक्षलवादी चळवळीशी संबंधित आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या या कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.


