नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले आहे. पक्षात विसंवाद असल्याच्या चर्चा निराधार असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे एकसंध असल्याचा दावा पक्षाचे नेते पाटील यांनी केला आहे.
सोमवारी दिल्लीत अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत मतभेद, नेतृत्व आणि महायुतीतील समन्वयाबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते. मात्र, या भेटीला कोणताही राजकीय संघर्ष किंवा अंतर्गत नाराजीचा संदर्भ नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पक्षाचे म्हणणे आहे की, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी यापूर्वीच अमित शहा यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळही आपल्याला भेटणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांना कळवले होते. त्यानुसार या भेटीसाठी वेळ मागण्यात आली होती.
या शिष्टमंडळात सहभागी असलेल्या वरिष्ठ नेत्यांना अजित पवार यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या निर्णयांची, राज्याच्या हिताशी संबंधित विषयांची तसेच पक्षाच्या संघटनात्मक प्रश्नांची सखोल माहिती आहे. त्यामुळे या विषयांवर केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करण्याच्या उद्देशाने ही भेट आयोजित करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
दरम्यान, या भेटीत नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसंदर्भातील मुद्देही मांडले. तसेच महायुतीतील अन्य घटक पक्षांच्या नेत्यांशी अनौपचारिक चर्चाही करण्यात आली. त्यामुळे या बैठकीचा अर्थ पक्षातील मतभेद किंवा नेतृत्वाबाबतची नाराजी असा लावणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.
महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करत आहे. युतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या औपचारिक भेटींना अनावश्यक राजकीय रंग देऊ नये. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षात मतभेद आणि समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र उभे करणे योग्य नाही, असे आवाहनही पाटील यांनी केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, अमित शहांच्या भेटीवरून सुरू झालेल्या चर्चांना पक्षाने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे.


