मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी रविवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला अनुपस्थित होत्या.
बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आगामी रणनीती आणि पक्षांतर्गत विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली होती. त्यानंतर आता पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशिवाय शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि दोन गट पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपला सोडल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, निकालानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर पक्षाने आत्मचिंतन करून जनतेमध्ये जाण्याची गरज असल्याचे म्हटले होते. प्रवक्त्यांच्या नियुक्तीवरून छगन भुजबळ यांनीही आपल्याला नियुक्त्यांची माहिती माध्यमांतून मिळत असल्याचे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली आणि पक्षांतर्गत समीकरणांबाबत काही निर्णय झाला का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.


