सुनील जाधव, मुंबई
मुंबई : कोब्रा जातीच्या सापाचे विष आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना काशीगाव पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने अटक केली. गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काशीगाव येथील दोडिया पेट्रोलपंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून सर्पविष, मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५ कोटी २१ लाख ८० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फैजान अब्दुल अजीज (वय ३०, रा. तळोजा, नवी मुंबई), अब्दुल करीम रशीद अहमद शेख (वय ५१) आणि मोहम्मद दानीश फयीम खान (वय २३, दोघेही रा. चिता कॅम्प, मानखुर्द) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोडिया पेट्रोलपंप परिसरात सर्पविष विक्रीसाठी काही व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत काचेच्या बाटल्यांमध्ये भरलेले कोब्रा जातीच्या सापाचे संशयित विष आढळले. बाटल्यांसह विषाचे एकूण वजन ३९३ मिलीग्रॅम, तर निव्वळ विषाचे वजन २५० मिलीग्रॅम असल्याचे नोंदवण्यात आले आहे. जप्त केलेल्या मोटारसायकलची किंमत ८० हजार रुपये आहे.
या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील विष आरोपींपर्यंत कसे पोहोचले, त्याचा पुरवठादार कोण आणि ते कोणाला विकले जाणार होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या व्यवहारामागे मोठे तस्करीचे जाळे असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालय, मुंबई येथील वनपाल युवराज जोशी यांच्या तक्रारीवरून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२२) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काशीगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. न्यायालयाने तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


