स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी हायड्रो गांजाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा आणि ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला.
२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास अंधेरी पूर्व येथील जे. के. इंडस्ट्रियल इस्टेटजवळील पेपर बॉक्स रोड परिसरात एमआयडीसी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. यावेळी दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासणी केली असता एका तरुणाकडील लाल प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रो गांजा आढळला.
ओंकार राजेंद्र पवार (२८, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव) आणि पियुष मधुकर घोंगडे (२२, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सातारा जिल्ह्यातून मुंबईत हायड्रो गांजाच्या विक्रीसाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२४४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर व पोलीस निरीक्षक सुनील करांडे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक रणजीत गोंदुकुणे, पोलीस हवालदार गौतम बडे, बाबू येडगे, सचिन ठोंबरे, पोलीस शिपाई लोखंडे आणि बिनल शिंगाणे यांनी ही कारवाई केली.


