मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी आणि मोकळ्या जागांमध्ये बिनधास्तपणे कचरा टाकणाऱ्यांना आता सावध व्हावे लागणार आहे. कारण, अशा बेजबाबदार नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेण्यास सुरुवात केली आहे. कचरा टाकण्यासाठी एखादी व्यक्ती संबंधित ठिकाणी येताच एआय आधारित कॅमेरा तिच्या हालचाली टिपणार असून, तत्काळ स्वच्छतेचा संदेश देऊन तिला कचरा टाकण्यापासून परावृत्त करणार आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानाच्या मदतीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
🔷मुंबईतील मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांवर (Garbage Vulnerable Points- GVP’s) कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाने तंत्रज्ञानाधारित अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
🔷माहीम येथील डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटीका येथे… pic.twitter.com/UXQCzJsKTJ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 29, 2026
मुंबईत अनेक ठिकाणी वारंवार कचरा साचत असल्याने अशा संभाव्य ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागातील माहीम येथील गजानन वाटिका परिसरात प्रायोगिक तत्त्वावर एआय आधारित कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल टिपली जाते आणि तिला स्वच्छतेचा संदेश दिला जातो.
मुंबईत १२७ ठिकाणी एआयचा पहारा!
माहीममधील प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद आणि त्याची परिणामकारकता लक्षात घेऊन या यंत्रणेचा विस्तार करण्याची महापालिकेची योजना आहे. ‘जी उत्तर’ विभागात आणखी २३ ठिकाणी, तर संपूर्ण मुंबईत एकूण १२७ ठिकाणी एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे कचरा टाकण्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे आणि सहाय्यक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई यांच्या पुढाकारातून हा प्रायोगिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
नागरिकांच्या सवयी बदलण्यावर भर
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यानंतर केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा नागरिकांच्या वर्तनात आणि सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. एआय कॅमेऱ्याच्या माध्यमातून तत्काळ दिला जाणारा स्वच्छतेचा संदेश नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देईल. त्यामुळे वारंवार कचरा साचणाऱ्या ठिकाणांवरील अस्वच्छतेला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
या प्रायोगिक उपक्रमाच्या परिणामकारकतेचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील अन्य भागांतही ही यंत्रणा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे. मात्र, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिका प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. त्यामुळे रस्त्यांवर, उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


