मुंबई प्रतिनिधी
मुंबई आणि परिसरात हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाने घरे उपलब्ध करून दिली; मात्र सोडतीत घर लागूनही तब्बल १,०८६ विजेत्यांनी अद्याप सदनिकांचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे आता म्हाडाने या विजेत्यांना थेट अल्टिमेटम दिला आहे. येत्या ३ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधून घराचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा संबंधित सदनिका रद्द करून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाईल, असा स्पष्ट इशारा म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २०१६ मध्ये कोन-पनवेल येथे गिरणी कामगारांसाठी २,४१७ घरांची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत अनेक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काचे घर मिळाले. मात्र, विविध कारणांमुळे अद्याप १,०८६ विजेत्यांनी आपल्या सदनिकांचा ताबा घेतलेला नाही. परिणामी, या सदनिका वापराविना पडून असून त्यांची देखभाल आणि उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने आता कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित विजेत्यांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांनी ३ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह म्हाडाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी संबंधितांनी नागरिक सुविधा केंद्र, प्रवेशद्वार क्रमांक ४, म्हाडा कार्यालय, वांद्रे पूर्व येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदन किंवा विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित विजेत्यांच्या विनंत्यांचा भविष्यात विचार केला जाणार नाही. तसेच त्यांच्या सदनिका रद्द करून प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसाठी ही घरे महत्त्वाची आहेत. त्यामुळे सोडतीत घर लागलेल्या मात्र अद्याप ताबा न घेतलेल्या कामगारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.


