बीड प्रतिनिधी
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अंधारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर बीड जिल्ह्यातील मूळगाव नंदनज, ता. परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुषमा अंधारे यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे आईच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसैनिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी बीडच्या दिशेने धाव घेतली आहे.
सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या, अभ्यासक आणि सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या म्हणून कार्यरत आहेत. आक्रमक वक्तृत्वशैलीमुळे त्या राजकीय वर्तुळात परिचित आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आई आणि आजोबा दगडू अंधारे यांचे मोठे योगदान राहिले आहे.
आजोबांनी त्यांचे संगोपन केले, तर आईने कष्ट करून मुलांना वाढवले आणि सन्मानाने जगण्याची शिकवण दिली. सुषमा अंधारे अनेकदा आपल्या भाषणांमधून आई आणि आजोबांच्या योगदानाचा उल्लेख करत असतात. आईशी त्यांचे अत्यंत जवळचे नाते होते. त्यांच्या निधनामुळे अंधारे यांचा मोठा आधार हरपला आहे.


