स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : ओला-उबरसाठी वापरल्या जाणाऱ्या टोयोटा रुमियन कारमधून रेकी करून रस्त्यावर उभे असलेले मालाने भरलेले टेम्पो चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत निर्मल नगर आणि शाहूनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून, चोरीला गेलेला टाटा एस टेम्पो, टोयोटा रुमियन कार आणि टेम्पोमधील कपड्यांच्या गोण्या असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी टोयोटा रुमियन कारमधून परिसराची रेकी करत असत. त्यानंतर रस्त्यावर उभे असलेले मालवाहू टेम्पो हेरून ते चोरी करून नेत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. विशेष म्हणजे, घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि त्यांची ओळख पटवली.
त्यानंतर वांद्रे पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर टोयोटा रुमियन कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. या पथकात पोलीस हवालदार खंडारे, वाघमारे, परदेशी तसेच पोलीस शिपाई भोगले, कदम आणि कोळी यांचा समावेश होता.


