सांगली : प्रदीप जोशी
सांगली : अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक आणि सेवन रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कारवाई अधिक प्रभावी करावी. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीवर भर देत सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी एनकॉर्ड समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा सदस्य सचिव रावसाहेब समुद्रे, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
अंमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीसाठी पोलीस, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, उद्योग, उत्पादन शुल्क आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे. कायद्याची कठोर अंमलबजावणी, व्यसनमुक्ती आणि जनजागृतीच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावी करावी. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांची साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाने व गोदामांची नियमित तपासणी करावी. संशयास्पद बाबी आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देऊन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य शासनाच्या ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामगिरीचे १ नोव्हेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत मूल्यांकन करण्यात येणार आहे. गृह विभागाने निश्चित केलेल्या आराखड्यानुसार सहा प्रमुख घटकांतील ४० निकषांच्या आधारे एकूण ६५० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कृती आराखडा तयार करावा, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
या मूल्यांकनात एनकॉर्ड समितीच्या बैठका, अंमली पदार्थांविरोधातील कारवाई, पुरवठ्यात घट, सेवनाविरोधातील जनजागृती, व्यसनमुक्ती व पुनर्वसन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या सहा घटकांचा समावेश आहे.


