प्रदिप जोशी/ सांगली
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यांमध्ये १२ ऑक्टोबर २०२६ अखेर एकूण ३ लाख ४३ हजार ८१६ खातेदारांपैकी २ लाख ७१ हजार ६४५ खातेदारांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. खातेदारांच्या संख्येनुसार ७९.०१ टक्के, तर क्षेत्रफळानुसार ७९.४३ टक्के पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ८१ हजार ३९३.९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करणे अपेक्षित आहे. त्यापैकी २ लाख २३ हजार ५२०.९२ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळामुळे बाधित झालेल्या क्षेत्राची अचूक नोंद घेऊन पुढील कार्यवाही करता यावी, यासाठी महसूल आणि संबंधित यंत्रणांकडून पंचनाम्यांचे काम सुरू आहे.
मिरज तालुक्यात ४९ हजार खातेदारांचे पंचनामे पूर्ण
मिरज तालुक्यात एकूण ७० हजार ५०२ खातेदार असून, त्यांच्याकडील एकूण क्षेत्र ५८ हजार ५२५.७६ हेक्टर आहे. यापैकी ४९ हजार ३९६ खातेदारांच्या ४१ हजार १५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
सांगली अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण ३५ हजार ५१४ खातेदार असून, त्यांच्याकडील क्षेत्र १८ हजार ७१२ हेक्टर आहे. यापैकी १८ हजार ८८१ खातेदारांच्या ११ हजार २२१.३३ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची नोंद आहे.
आटपाडीत पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात
आटपाडी तालुक्यात पंचनाम्यांची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली आहे. तालुक्यात एकूण ३९ हजार ९४१ खातेदार असून, ३७ हजार २४२.५६ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ३९ हजार ४१६ खातेदारांच्या ३६ हजार २६८.४३ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. खातेदारांच्या तुलनेत पंचनाम्यांचे प्रमाण मोठे असून, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
जत तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावरील पंचनामे
जत तालुक्यात एकूण ८६ हजार ७६८ खातेदार असून, त्यांच्याकडील क्षेत्र १ लाख १४ हजार २५७.२४ हेक्टर आहे. यापैकी ७० हजार ९४३ खातेदारांच्या ९० हजार ७७६.४४ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील चार तालुक्यांपैकी जत तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र असल्याने येथील पंचनाम्यांना विशेष महत्त्व आहे.
कवठेमहांकाळमध्ये ४० हजारांहून अधिक खातेदारांचे पंचनामे
कवठेमहांकाळ तालुक्यात एकूण ५१ हजार १३० खातेदार असून, त्यांच्याकडील क्षेत्र ३१ हजार ५२२ हेक्टर आहे. यापैकी ४० हजार ६९१ खातेदारांच्या २५ हजार २९५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद घेण्याचे काम महत्त्वाचे ठरत आहे. पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्राची माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उर्वरित पंचनामे वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.


