छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपांवर पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवली. आपल्याविरोधात बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय जनता पक्षाकडून आपल्या नावावर ५०० कोटी रुपये घेतले का आणि घेतले असल्यास ते आपल्यापर्यंत पोहोचले का, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला होता. याबाबत शिंदे यांनीच उत्तर द्यावे, अन्यथा ऑडिओ क्लिप सार्वजनिक करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. शिंदे यांनी आरोप फेटाळत जरांगे यांना पुरावे सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ही क्लिप ऐकवली.
क्लिपमध्ये काय दावा?
जरांगे पाटील यांना वेळीच रोखले नाही, तर मराठवाड्यात ते भाजपला अडचणीत आणतील, त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलून त्यांना राजकीयदृष्ट्या नुकसान पोहोचवले पाहिजे, अशा आशयाचे वक्तव्य ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. जरांगे भाजपला मराठाद्रोही ठरवत असल्याचाही उल्लेख त्यात आहे.
दुसऱ्या भागात जरांगे पाटील यांच्यापर्यंत ५०० कोटी रुपये पोहोचल्याचा आणि हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत दिल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे यांची भूमिका फायद्याची ठरेल की नाही, याबाबतही क्लिपमध्ये मत व्यक्त करण्यात आले आहे.
आपल्यावर सलग तीन वर्षांपासून आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जरांगे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नसल्याचे आणि दिलेही नसल्याचे सांगितले असल्याचा संदर्भ देत, या कथित षडयंत्राचा शोध पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


