सातारा प्रतिनिधी
सातारा : कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे परतणाऱ्या साताऱ्यातील चार तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कराड शहराजवळ नव्याने वाहतुकीस खुल्या झालेल्या सहापदरी उड्डाणपुलावर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. स्कॉर्पिओ गाडी ट्रकला मागून धडकल्याने गाडीचा चुराडा झाला. या नव्या उड्डाणपुलावरील हा पहिलाच भीषण अपघात असल्याचे सांगितले जात आहे.
Satara – A tragic road accident near Karad in Maharashtra’s Satara district claimed the lives of four friends and left three others injured after a Scorpio SUV collided with a truck on the Pune-Bengaluru Highway at around 11 pm. The accident occurred on a newly constructed… pic.twitter.com/MBwkjcDnhS
— NextMinute News (@nextminutenews7) October 21, 2026
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या कातरखटाव गावातील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन रात्री गावी परतत असताना त्यांच्या गाडीला कराडजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत तेजस देशमुख (वय २५, चालक), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) या चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांच्यासह स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. चार तरुणांच्या मृत्यूमुळे कातरखटाव गावासह त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


