मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वेसावे ते भाईंदर ही शहरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचा आढावा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतला. त्यांनी अनेक प्रकल्पस्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचे काम पॅकेज ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोडरस्ता (डीबीएलआर) अशा सात टप्प्यांत विभागण्यात आले आहे. या प्रकल्पातील विविध कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. आयुक्त भिडे यांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात दिंडोशी न्यायालय परिसरातील गोरेगाव कनेक्टरच्या उन्नत मार्गापासून झाली. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीकडे जाणारा उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला आहे. हा पूल मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाशी जोडण्यात येणार आहे.
पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव ते ओबेरॉय मॉलदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या ३८ खांबांपैकी ११ खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू असून, त्याबाबतची सविस्तर माहिती आयुक्तांनी घेतली. गोरेगाव येथे सध्या अस्तित्वात असलेला वीर सावरकर उड्डाणपूल (एमटीएनएल) न पाडता त्याच्या वरून नवीन उन्नत पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नव्या पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतुकीला किनारा रस्त्याची जोडणी मिळणार आहे. या कामाचीही त्यांनी पाहणी केली.
यानंतर ओशिवरा येथील लोखंडवाला संकुलातील मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कार्यालयात संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून कामांचा आढावा घेण्यात आला. पॅकेज ए अंतर्गत लोखंडवाला-मिल्लत नगर जंक्शन येथे सुमारे १० हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, या ठिकाणी पायलिंगचे काम सुरू आहे. आयुक्तांनी या कामांची पाहणी केली. याच परिसरातील भगतसिंग नगर येथे ओशिवरा खाडीवर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.
भगतसिंग नगर येथील उड्डाणपुलाचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. खाडीच्या दुसऱ्या बाजूला असलेली काही बांधकामे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून हटविणे आवश्यक असल्याने त्यासाठी पाठपुरावा करण्यासही त्यांनी सांगितले. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत भगतसिंग नगरमधील झोपडपट्टी पुनर्विकासाचे कामही मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यामुळे पूल उतरल्यानंतर विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्याने नवीन लिंक रोडपर्यंत पोहोचणे शक्य होईल. यासाठी एसआरएकडे सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पॅकेज बी अंतर्गत मालाड येथील माईंडस्पेस गार्डन परिसरातील पायलिंगच्या कामांचीही आयुक्तांनी पाहणी केली. एमडीपी मार्ग आणि माईंडस्पेस उद्यान परिसरातील प्रस्तावित कामांची ठिकाणे, उद्यानाची संरक्षक भिंत तसेच उच्चदाब वीजवाहिनी यांसारख्या बाबींची त्यांनी माहिती घेतली.
मालाडमधील माईंडस्पेस ते कांदिवलीतील चारकोपदरम्यान पॅकेज सी आणि डी अंतर्गत प्रत्येकी सुमारे ३.९ किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहेत. यापैकी पॅकेज सीमध्ये उत्तर दिशेच्या, तर पॅकेज डीमध्ये दक्षिण दिशेच्या बोगद्याचे काम केले जाणार आहे. या बोगद्यांच्या बांधकामासाठी कांदिवलीतील चारकोप येथे लॉन्चिंग शाफ्ट उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे ६५ मीटर लांब आणि ४० मीटर रुंद जागेत खोदकाम व पायलिंग सुरू असून, आयुक्तांनी या कामांचीही पाहणी केली.
पॅकेज ई अंतर्गत कांदिवलीतील चारकोप इंटरचेंज ते गोराई इंटरचेंजदरम्यान सुमारे ३.७८ किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येत आहे. या कामाचीही आयुक्त अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या दौऱ्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (पायाभूत प्रकल्प) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (मुंबई किनारा रस्ता-उत्तर) मंतय्या स्वामी, उपप्रमुख अभियंता वैभव गांधी यांच्यासह संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.


