नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “मी काय केलं? मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणीही नाही. मी कोणताही कायदा मोडलेला नाही, मग मला अटक का करत आहात?” असे प्रश्न उपस्थित करत अभिजीत दीपके पोलिसांना विचारणा करत होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना घराबाहेरूनच ताब्यात घेतले. कॅनॉट प्लेस येथील आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आल्याने सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
"अभी डिटेन कर रहे हैं…"
"अभी तो मैंने कोई लॉ ब्रेक ही नहीं किया…"
अभिजीत दीपके और पुलिस के बीच की ये बातचीत सुनिए जरा- pic.twitter.com/C470Jfm1jV
— Akshay Pratap Singh (@AkshayPratap94) October 16, 2026
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना दुपारी त्यांच्या निवासस्थानी नोटीस दिली होती. यावेळी त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा करून आंदोलन न करण्यास सांगण्यात आले. मात्र, दीपके आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. ते घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यांना अडवले आणि प्रतिबंधात्मक ताब्यात घेत असल्याचे सांगितले. कॅनॉट प्लेस परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू असल्याचे कारण पोलिसांनी दिले. त्यावर आपण कोणताही कायदा मोडलेला नसून एकटेच असल्याचे दीपके वारंवार सांगत होते. यावेळी घटनास्थळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी जमली होती. सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दीपके यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासूनच पोलीस तैनात होते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेऊन जबरदस्तीने वाहनात बसवून सोबत नेले. मात्र, त्यांना नेमके कुठे नेण्यात आले, याची माहिती समोर आलेली नव्हती. त्यामुळे सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये होणारे तिरंगा आंदोलन थांबेल, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, या कारवाईनंतरही शेकडो नागरिक सेंट्रल पार्कमध्ये जमले. त्यांच्या हातात तिरंगा होता. नेत्याला ताब्यात घेण्यात आले असतानाही नागरिकांनी शांततेत तिरंगा रॅली सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे सेंट्रल पार्क परिसरातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली.


