स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने चरस जवळ बाळगल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एका २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद कासिफ फारुख शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १ हजार ११३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या चरसची अंदाजे किंमत १ कोटी ११ लाख ३० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे शाखा, मुंबईचे पथक गस्तीवर होते. यावेळी जोगेश्वरी बस डेपो परिसरातील एस. व्ही. रोडवरील मॅक कॅफेसमोर एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याचे आढळले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून चरस जप्त करण्यात आले. यानंतर मोहम्मद कासिफ फारुख शेख याला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेला मोहम्मद कासिफ फारुख शेख हा २३ वर्षांचा असून, तो मुंबईतील माझगाव परिसरातील घोडदेव येथील मोदी कंपाउंडमध्ये राहतो. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-शृंगी आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे येथील प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.


