स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानातून कपडे चोरी करणाऱ्या तीन आरोपींना खार पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. खार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक यांच्या मदतीने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई केली. आरोपींकडून शर्ट, पॅन्ट, स्वेटर, जिन्स पॅन्ट आणि ट्रॅक पॅन्ट असे एकूण २४० नग कपडे हस्तगत करण्यात आले असून, त्यांची किंमत ३ लाख ९० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे खार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांतील चोरीस गेलेली मालमत्ता शंभर टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी खार पश्चिम येथील शुभ्रा अपार्टमेंटमधील शॉप क्रमांक २ येथे कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपींनी फिर्यादी राजेश नरसी पटेल यांच्या दुकानातील कपडे चोरी केले होते. चोरी करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान होते. मात्र, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी नाशिक येथील कुरेशी नगर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२९/२०२६ आणि १७३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींचा वडाळा तसेच आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अशाच प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांशीही संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त, पश्चिम परिमंडळ डॉ. मोहितकुमार गर्ग आणि खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेश चौधरी आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.


