नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची २४ तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. वर्षभर शांतता भंग करणार नाही, या अटीवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासह इंटरनेटवरील निर्बंध हटवण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. या घडामोडींनंतर कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनाबाबत पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
सुटकेनंतर दुपारी २ वाजता अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आशुतोष रांका यांनी दिली. आंदोलन पुढे सुरू राहणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावरील पोस्टमधून मांडली होती. पुन्हा जंतरमंतरवर मोर्चा काढून मागण्या पूर्ण होईपर्यंत तिथेच ठाम राहण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला होता.
निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनामुळे दिल्लीत जवळपास टाळेबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शनिवारी अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, पिनाराई विजयन, नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राजधानीतून सुमारे सहा हजार लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलकांना जंतरमंतरपर्यंत पोहोचू दिले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर आजही त्याच जोमाने जंतरमंतरवर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे नवे प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत घरी परतणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पक्ष आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवणार, तसेच अभिजीत दिपके त्यांच्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी परतणार का, याबाबत उत्सुकता आहे.
दिल्लीतील शनिवारच्या आंदोलनापूर्वी आणि आंदोलनादरम्यान आंदोलक, नागरी समाजाचे सदस्य, वकील आणि पत्रकारांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतल्याच्या वृत्तांवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने चिंता व्यक्त केली होती. या चिंतेला भारताने शनिवारी प्रत्युत्तर दिले.


