मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्पेशल सर्व्हिलन्स (एसएस) टीमने एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटवर कारवाई केली. पोलिसांनी एका महिला एजंटला ताब्यात घेत अटक केली असून, तिच्या तावडीत असलेल्या एका मॉडेलची या जाळ्यातून सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.
एमबीव्हीव्ही पोलिसांच्या एसएस टीमला संबंधित हॉटेलमध्ये देहविक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ‘क्वालिटी इन’ हॉटेलवर अचानक धाड टाकली. कारवाईवेळी एका महिला एजंटला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. तपासात संबंधित महिला एजंट एका मॉडेलला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांचा सौदा करत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या कारवाईनंतर महिला एजंटला अटक करण्यात आली असून मॉडेलची या जाळ्यातून सुटका करण्यात आली आहे. एसएस टीमच्या प्रमुख शीतल मुंडे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या नियोजनबद्ध कारवाईमुळे हाय-प्रोफाइल रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या रॅकेटचे जाळे मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरापलीकडे आणखी कुठे पसरले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या व्यवसायामागे आणखी कोणत्या व्यक्ती किंवा दलालांचा सहभाग आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. संबंधित महिला एजंटने आणखी किती मुलींना अशा प्रकारे जाळ्यात ओढले आहे, याचाही तपास पोलिसांकडून केला जात असून तपासाअंती आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


