सीतापूर/उत्तर प्रदेश:
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात रुग्णालयाबाहेरील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “जा, माझे निलंबन करा; यापेक्षा काय करू शकता?” असे महिला पोलीस अधिकारी स्वाती चतुर्वेदी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शुक्ला यांना सुनावल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर चतुर्वेदी यांची रुग्णालयाबाहेरील पोलीस चौकीतून उचलबांगडी करण्यात आली.
सीतापूर शहरातील रुग्णालयाबाहेर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी होत्या. रुग्णवाहिकांनाही रुग्णालयाच्या गेटपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ई-रिक्षांची संख्या वाढल्याने परिस्थिती आणखी बिकट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच तक्रारीबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शुक्ला पोलीस ठाण्यात गेले होते.
यावेळी शुक्ला आणि महिला पोलीस अधिकारी स्वाती चतुर्वेदी यांच्यात वाद झाला. शुक्ला यांनी रुग्णालयाच्या गेटबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून रुग्णवाहिका अडकत असल्याचे सांगितले. रुग्णांना वॉर्ड बॉयकडून उचलून रुग्णालयात न्यावे लागत असल्याने परिस्थिती गंभीर असल्याचेही त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
वाद सुरू असताना शुक्ला हे मोबाईलवरून व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याचे सांगण्यात येते. यावर चतुर्वेदी यांनी आक्षेप घेतला. “तुम्ही माझा व्हिडीओ काढत आहात. जा आणि माझे निलंबन करा. यापेक्षा तुम्ही आणखी काय करू शकता?” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
त्यावर शुक्ला यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. “मी तुमचा व्हिडीओ का काढू? मी केवळ समस्या सांगत आहे. ती सोडवणे हे तुमचे काम आहे,” असे त्यांनी म्हटल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
यानंतर वाद आणखी वाढला. स्वाती चतुर्वेदी यांनी आपली पोस्टमॉर्टम ड्युटी असल्याचे सांगत या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी ठाणेप्रमुखांना कळवावी, असे स्पष्ट केले. सुमारे अर्धा तास दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल यांच्याकडे या प्रकाराची माहिती दिली.
तक्रारींची मालिकाच; चोरीची घटनाही चर्चेत
दरम्यान, रुग्णालयाबाहेरील परिस्थितीबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुग्णालयासमोर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप आहे. त्याच परिसरात चोरीच्या घटनाही घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्चना शुक्ला या आपल्या मुलीला घेऊन औषध घेण्यासाठी रुग्णालयात आल्या असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना घडली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाबाहेरील पोलीस चौकीत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची तक्रार तेथे नोंदवून न घेता त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप आहे.
महिला अधिकाऱ्याची चौकीतून उचलबांगडी
भाजप जिल्हाध्यक्षांच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा स्वाती चतुर्वेदी यांची रुग्णालयाबाहेरील पोलीस चौकीतून बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाईनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी स्वाती चतुर्वेदी यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. महिला सक्षमीकरण आणि महिला शक्तीबाबत बोलणाऱ्या भाजपने कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चतुर्वेदी यांची अचानक बदली का करण्यात आली, याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे भाजप नेते विरुद्ध महिला पोलीस अधिकारी असा वाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरला असून, व्हायरल व्हिडीओमुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.


