मुंबई प्रतिनिधी
मुंबई : हॉटेलचे फायर कम्प्लायन्स लेटर देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुंबईतील फोर्ट परिसरातील अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. केंद्र अधिकारी अरुण देवळे आणि अमोल मुळीक अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. बुधवारी फोर्ट येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका हॉटेल व्यावसायिकाला अग्निशमन विभागाकडून आवश्यक असलेले कम्प्लायन्स लेटर घ्यायचे होते. हे पत्र देण्यासाठी अरुण देवळे आणि अमोल मुळीक यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोड होऊन ८० हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी फोर्ट येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात आला. त्यावेळी ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे अग्निशमन दलाच्या कार्यालयात खळबळ उडाली असून, दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


