मुंबई प्रतिनिधी
मुंबई : खार पश्चिम परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि अन्य एक स्कूटीस्वार जखमी झाले. सी. डी. रोड आणि १६व्या रस्त्याच्या जंक्शनवर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा अपघात झाला. या प्रकरणी खार पोलिसांनी ७१ वर्षीय कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इयाप्पन सेल्वराज हरीजन (४१) आणि त्यांची पत्नी नॅन्सी (३७) हे दुचाकीवरून वांद्र्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, नॅन्सी रस्त्यावर फेकल्या गेल्या, तर इयाप्पन हे मोटारीखाली अडकले. त्यांनी हेल्मेट परिधान केले होते.
अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रयत्न करून मोटार उचलत इयाप्पन यांना बाहेर काढले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. जखमी इयाप्पन आणि नॅन्सी यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी इयाप्पन यांना मृत घोषित केले. नॅन्सी यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेल्या मोटारीने आणखी एका स्कूटीस्वाराला धडक दिली. या अपघातात त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे या घटनेत एकूण तिघे जखमी झाले असून, त्यापैकी इयाप्पन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी खार पोलिसांनी कारचालक सुधीर सिताराम सावंत (७१) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२४(४), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच कारचा वेग किती होता, याचा तपास खार पोलीस करीत आहेत.


