मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या खादी व ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजक, महिला बचतगट तसेच स्थानिक उत्पादकांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन आणि उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे उपस्थित होते. मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते प्रदर्शनातील एका स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ
या प्रदर्शनात विविध ग्रामोद्योग संस्था आणि महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. मध संचालनालय, क्राफ्टी आर्च, माई महिला बचतगट, ब्युटी क्वीन बीज-गिफ्टेक्स इंडस्ट्रीज, जीन क्रिएशन, सई लेदर वर्क्स शॉप, कोल्हापूर, औद्योगिक व्यवसाय संस्था, मुंबई, कस्तुरबा सोलर खादी समिती, अमरावती, नागपुरे ड्रायफूड्स, जागृती हळद पावडर, फ्लोरिया नॅचरल्स, ग्लॅमरएक्स इम्पेक्स, निद्रा क्रिएशन, ठाणे आणि मॉर्डन लेदर आर्ट, माथेरान आदी संस्थांचा सहभाग आहे.
प्रदर्शनात ‘मधुबन मध’, खादी वस्त्रे, घरगुती पापड, लोणची, सौंदर्य प्रसाधने, हळद, विविध ड्रायफूड्स आणि कोल्हापुरी चप्पल यांसह विविध खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. महिला बचतगट तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळाली आहे.
१ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हे प्रदर्शन १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट देऊन खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची खरेदी करावी आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


