मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सांताक्रुझमध्ये गटार साफ करण्यासाठी महापालिकेच्या चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांपैकी एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत दुसरा कामगार गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयासमोरील रोड क्रमांक ८ येथे ही घटना घडली.
मृत कामगाराचे नाव संतोष गणपत काष्टे (४७) असून जखमी कामगाराचे नाव अजय ध्यानचंद ठाकूर (२६) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्ही. एन. देसाई रुग्णालयासमोरील रोड क्रमांक ८ येथील एका सोसायटीची गटार लाईन ब्लॉक झाली होती. ही गटार लाईन साफ करण्यासाठी सोसायटीने सोमवारी सकाळी खासगी कामगारांना बोलावले होते.
साफसफाईचे काम सुरू असताना कामगार सोसायटीच्या गटारातून पुढे जात रस्त्यावरील महापालिकेच्या चेंबरमध्ये उतरले. यावेळी चेंबरमधील विषारी वायू किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दोघांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात संतोष काष्टे यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अजय ठाकूर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच जखमी अजय ठाकूर याला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, संतोष काष्टे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी वाकोला पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून आवश्यक माहिती घेतली जात असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


