पुणे प्रतिनिधी
पुणे : उंड्री परिसरात २३ वर्षीय नवविवाहित आयटी इंजिनिअर तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वैष्णवी जरांडे असे मृत तरुणीचे नाव असून, हुंड्यासाठी तिचा सासरी छळ होत असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. लग्नासाठी माहेरच्यांनी ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोन्याचे दागिने दिले असतानाही कार घेण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली, असा आरोप आहे. वैष्णवी बंगळुरूतील आयटी कंपनीत कार्यरत होती. काही दिवसांपासून ती ‘वर्क फ्रॉम होम’ करत होती. याच काळात तिचा सासरी सातत्याने छळ होत असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. कार खरेदीसाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, २४ सप्टेंबरच्या रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आईला फोन करून सासरी आपला छळ होत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पतीचा माहेरी फोन आला. ‘तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल’, असा इशारा त्याने दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर वैष्णवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तिचा फोन लागला नाही. चिंतेत असलेले आई-वडील तातडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
मात्र, ते वैष्णवीच्या सासरी पोहोचेपर्यंत मोठी दुर्घटना घडली होती. घरात वैष्णवीचा मृतदेह गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सासरच्या मंडळींनी वैष्णवीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, मुलीच्या मृत्यूबाबत तिच्या आई-वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली की तिच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याबाबत तपासातूनच सत्य समोर येणार आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हुंड्यासाठी छळाच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. नवविवाहित मुलीचा अवघ्या काही महिन्यांत झालेला मृत्यू आणि मृत्यूपूर्वी झालेल्या फोन संभाषणामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.


